|| श्री ||

 

हरवलेला मैत्री कट्टा!

 

            रोज सारखाच तो ही दिवस होता! सकाळचे ८ वाजले होते, मुले शाळा आणि यजमान ऑफिसला  निघण्याची ही रोजचीच वेळ. ते निघाले की दिवाणखान्यातील खिडकीजवळ बसून १५ मिनिटे पेपर वाचायचा हा माझ्या नित्यक्रम झाला होता. पेपर वाचतांना समोरच्या उद्यानाच्या कुंपणाच्या झाडावरच्या पक्षांचे बडबडणे, गाणे, ऐकमेकांना हाक मारणे हे सगळं ऐकणे माझे नित्याचे झाले होते. हे पक्षी माझे अनोळखी पण ओळखीचे मित्र-मैत्रिणी झाले होते.

            कधी चिमण्यांचा चिवचिवाट, कधी कबुतरांची गुटरs  गुs, कधी छोट्या आमसुली-पिंगट  रंगाच्या टिटवीची टिव-टिव, कधी माझ्या पिट-पिटूची ( मी ठेवलेले पक्षाचे नाव पिट-पिटू ) पिट-पिटू , कधी भोवरीची घु-घु-घु, कधी शिळ घालणाऱ्या मैनेची शिळ, कधी राकट पाणकोंबडीचा मोठा आवाज, कधी सुतार पक्षाची  ठोक-ठोक-ठोक, कधी मधेच उडत जाणाऱ्या पोपटांचा आवाज, कधी शेपूट हलवित चालणाऱ्या काळ्या पक्षांची गुणगुण, कधी मधेच उडत जाता जाता कर्णकर्कश क्रौंच क्रौंच असा आवाज करणारा बगळ्यासारखा काळा पक्षी, कधी आमसुली रंग आणि पिवळी चोच असणाऱ्या जोडीचा संवाद! हे सारे त्या १५ मिनिटांत ऐकू यायचे.

            नाशिकच्या इंदिरानगरमधे झाडे भरपूर! त्यातच काही झाडे उद्यानाच्या आत तर काही बाहेर लावलेली आहेत. त्यातच काही झाडे उंच गेलेली तर काही गोलाकार पसरलेली आहेत. असेच एक निलगिरीचे झाड उंच-उंच वाढलेले होते. परंतु मी येथे वास्तव्यास आल्यापासून बघतेय त्या झाडाच्या उंच गेलेल्या दोन शाखांपैकी एक शाखा पुर्ण वाळलेली तर दुसरी शाखा वाळत चाललेली होती. त्या शाखा इतर झाडांपेक्षा फार उंच गेलेल्या होत्या आणि माझ्या खिडकीतून त्यांचे शेवटचे टोक देखील स्पष्ट दिसायचे.

            जसे पुर्वीच्या काळी राजे-महाराजे त्यांच्या किल्ल्यांना उंच बुरूज किंवा  परकोट बांधायचे टेहळणी करायला, तसेच या पक्षांनी टेहळणी करण्याकरिता हे झाड शोधले होते. त्या झाडाच्या शेंड्यांना छोट्या छोट्या काही शाखा होत्या. ही सगळी माझी मित्र मंडळी सकाळची न्याहारी आटोपून त्या शेंड्यांच्या शाखांवर आपल्या आवडीनुसार विराजमान होत. जगरहाटीच्या गप्पा करीत. गप्पा करून पोट भरले की उडून जात, मग त्या पक्षाची जागा घेण्याकरिता दूसरा कुणी पक्षी तेथे येऊन बसे. कधी ते पक्षी शिवाशिवीचा (पकडा-पकडीचा) खेळ खेळत. सकाळची कोवळी किरणे, शुद्ध हवा घेऊन आपल्या कामी लागत. दिवसभर त्या शाखांवर पक्षांची ये-जा सुरू असे. ते शेंडे बारीक असल्याने हवेच्या झोक्यासोबत माझ्या मित्रांनाही झोका मिळे. 

            Hi, hello, नमस्कार, स्मित न देता – घेता झालेले माझे मित्र – मैत्रिणी! त्यांना मी अनोळखी पण ते माझे जिवलग झालेले! माझ्या फ्लॅटच्या बाल्कनीतून तर ते झाड पूर्णच दिसायचे. त्यामुळे सायंकाळीही तिकडे नजर जायचीच आणि त्या गोड, मंजुळ गाणे-संभाषण यामुळे मन प्रसन्न व्हायचे.

            रोजप्रमाणे परवा सकाळी माझ्या मित्र – मैत्रिणींची  भेट झाली आणि मी माझ्या कामाला लागले. थोड्याच वेळात एका यंत्राचा कर्कश आवाज यायला लागला. पुन्हा थोड्या वेळात दुसरा मोठा आवाज आला कडाड्  कड् कड! काळजात धस्स झाले, मी खिडकीकडे धावले, त्या निलगिरीच्या झाडाची एक शाखा तोडली गेली होती! पुढे काय म्हणून मी पाहू लागले, तो ती माणसे झाडावरून खाली उतरली, लाकडे गोळा करून निघून गेली. मी नि:श्वास सोडला! माझ्या मित्रांची एक शाखा शाबूत होती.

            काल रोजप्रमाणेच माझे मित्र – मैत्रिणी आले होते. आज मात्र संख्या जरा कमीच होती, त्यांची एक शाखा कमी झाली होती ना! मलाही घडल्याप्रकाराने  जरा अस्वस्थच वाटत होते. उठले आणि माझ्या रोजच्या कामांना सुरुवात केली. थोड्याच वेळात यंत्राचा कर्णकर्कश आवाज येऊ लागला, पाठोपाठ परवाचा भयंकर मोठा आवाज कडाड् कड् कड! आज तर माझ्या क्षणभर श्वास अडकल्यासारखेच वाटले. मी खिडकीकडे धावले, ती दुसरी शाखा जमिनीवर कोसळत होती. माझ्या मित्रांच्या बुरुजांवर घाव घातले गेले होते. यंत्राचा आवाज आणखी कणखर होत, ते यंत्र त्या शाखेचे तुकडे – तुकडे करायला लागले होते. माझे मलाच रडू फुटले! माझे मित्र मला आता तेथे कधीच एकत्र दिसणार नव्हते. आज खिडकीतून दिसणारी पक्षांची हक्काची जागा नाहीशी झाली होती. त्यांच्या रंगणाऱ्या गप्पा थांबल्या होत्या. त्याचा फारसा कुणाला फरकही पडणार नव्हता. त्या शाखा वाळलेल्या होत्या परंतु कुणाचा-तरी मैत्री-कट्टा होत्या! तो मैत्री-कट्टा आता कधीच दिसणार नव्हता! कधीच नाही!

माझ्या मित्रांचा मैत्री-कट्टा कायमचा हरवला होता..!      

                                                                                                -मिनल श. सालफळे जोशी

 

Recent comments

Leave a Comment

Invalid captcha. Please try again.