|| श्री ||
पुणे -
दिवेआगर - पुणे
पुण्याहून पहाटेच प्रवासाला निघालो. प्रवास होता पुणे – दिवेआगर ! उन्हं थोडी पसरली होती, पण धुक्यानं अजून वाट सोडली नव्हती . वाट तशी वळणावळणाचीच! प्रवास पुण्याहून असला तरी पोहचायचे कोकणात होते. मग काय, सोबत होती महाराष्ट्राच्या दिमाखदार सह्याद्रीची ! रानफुले, रानफळे, रानझाडे यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा नटलेल्या होत्या. त्या उंचच्या उंच कडांनी हिरवा शालू पांघरला होता. त्यात हिरव्या रंगाच्या विलोभनीय छटा दिसत होत्या. पोपटी, गडद पोपटी, हिरवा, हिरवकंच, काळपट हिरवा, मध्येच कथ्था रंग आणि त्यावर लाल, पिवळ्या, निळ्या, जांभळ्या, गुलाबी रंगाचा फुलांनी साज केला होता.
मधेच
उंच कडा, मधेच एखडे १०-१५ घरांचे गाव, शेती, पुन्हा उंच कडा, घाट, वळणे आणि निसर्ग
सौंदर्य! आम्ही जशी वळणे घेत निघालो ना, तशी-तशीच आमच्यासोबत वळणे घेत निघाली होती
एक नदी मुळा! पुण्यातील एक मुख्य नदी! नव्हे आम्हीच तिच्या सोबतीने निघालो होतो
घाटातली वाट शोधत!
घाटातली
वाट, काय तिचा थाट
सौंदर्य
अफाट, सोबत नदीचे पाट
मुळशी
धरणापर्यंत आमच्या डाव्या बाजूने पर्वतरांगा तर उजव्या बाजूने मुळा नदी! काय किमया
आहे ना निसर्गाची जेथे उंच पर्वतकडा तेथे दुसऱ्या बाजूस खोल दरीत नदी!कधी दोन
पर्वतांना वेगळे करणारी म्हणा की जोडणारी म्हणा.. नदीच! नदीचे संरक्षण करणारे
पर्वत म्हणा की पर्वतांवरून वाहणाऱ्य धबधबारूपी पाण्याच्या लोटांना पोटात घेणारी
नदी म्हणा! पर्वतांच्या कुशीतून वाहणारी नदी अमृत घेऊन सपाट प्रदेशात येते, खेळत,
बागडत, लचकत, मुरडत, कधी उथळ खळखळाट करत तर कधी शांतपणे वाहत.
तेथून
पुढे ताम्हणी घाट! पर्वतांचे शिखर-सुळे इतके उंच की ढग त्यावर उतरतात की ते शिखर
ढगात लपतात प्रश्नच पडतो. काळे – पांढरे ढग त्या शिखरांवर उतरले होते. काही ठिकाणी
तर जवळजवळ अर्धा पहाडच त्या ढगांनी आच्छादला होता. काही पर्वत एकमेकांच्या हातात
हात घालून उभे होते. कधी द्रोण आकार करीत, कधी सरळ रेषेत, कधी तीन, कधी पाच, कधी
सात मोजता – मोजता पुरे वाट!
ताम्हणी
घाटानंतर पुढे होते कोकण! रस्ता थोडा अरूंदच! बऱ्याच अंतराने अगदी एकमेकांना खेटून
अससलेल्या २०-२५ कौलारू घरांचे गाव दिसत होते. ती हिरवाई, ती शांतता अहाहा! बरेच
दूर आलो होतो, निर्जन रस्ता..! वाटायला लागले रस्ता चुकलो की काय? म्हसाळा रोडने पुढे आलो, आजूबाजूला गाव नाही, वस्ती
नाही की दुकानं नाही. आणि गूगल मॅप काही किमी वर अथांग अरबी समुद्र दाखवतोय, काही
कळेच ना? एक अरुंद पुल, आजूबाजूला रानटी झाडे वाढलेली! मॅप तर हाच रस्ता दाखवतोय.
थोड्या पुढे एक गाडी दिसली, हुsश्श
!जिवात जीव आला. तो ४-५ किमीचा रस्ता पर केला आणि पुढे गाव दिवे-आगार!
रिसोर्ट
‘दरबानला’ राहणार होतो. तेथून ५०० मीटरवर समुद्र किनारा! रिसोर्ट नीटनेटके आणि
छानच होते. मधल्या आवारात मोकळी जागा आणि तेथे छानसे पाळणे देखील लावले होते.
पोहचल्यावर जरा वेळ आराम केला.भूक लागलीच होती. काही खायचे म्हणून ऑर्डर करावा तर
हॉटेल व्हेज-नॉनव्हेज आणि प्रिपरेशन किचन
एकच. इतरांनी जेवण मागवले, माझी पंचाईत!
तेथेच एका गृहस्थास शुध्द शाकाहारी जेवणाची सोय विचारली, त्यांनी सांगितले,
‘पांथस्थ प्रांगण’ दुसऱ्या गावी होते ते; दुसरे गाव ५ ते ७ किमी वर होते. शहरात
राहणाऱ्यांकरिता एवढे अंतर म्हणजे दुसरे नगर! तशी कोकणातील बरीच गावे अशाच अंतरावर आहेत. ‘पांथस्थ प्रांगण’ एक
शाकाहारी रिसोर्ट, साधे पण प्रसन्न! स्वागत कक्षात छोटेसे वाचनालाय होते. भोजनकक्ष
मोकळे होते, परंतु तेथे जायला चप्पल, जोडे कक्षा बाहेर काढण्याचा नियम होता.
मॅनेजरने प्रसन्नतेने आमचे स्वागत केले. स्वच्छता व निटनेटकेपणा होताच आणि
पदार्थांच्या चवी तर अप्रतिम! कोकम सरबत तर मी रोजच प्यायले; त्यांच्याच बागेतल्या
कोकमच्या फळांचे सरबत बनवायचे ते. कोकम सोबतच आंबा, चिकू अशी झाडे त्यांनी लावलेली होती. कैरीचे लोणचे
देखील त्यांचे स्वतःचे तयार केलेले होते. कैरीच्या लोणच्याला तर अगदी माझ्या
आजीच्या हाताची चव! जेवतांना मीच ते लोणचे फस्त करत होते!
दुपारी दरबान रिसोर्टहून ४-४.३० ला
पायीच चालत गेलो समुद्रकिनाऱ्यावर. फेसाळलेल्या लाटांचा समुद्र! अथांग समुद्र,
नारळाची-पोफळीची झाडे, मऊशार वाळू, त्यात उमटणारी पाऊले, समोर क्षितिजावर शांत होत
येणारे सुर्यबिंब आणि मग लक्ष गेले समुद्राच्या लाटा झेलत, मऊ वाळूत खेळणारे
आमच्यासारखे काही लोक! सध्याच्या ट्रेंडनुसार मोबाइल सोबत नेलाच होता. काही फोटो
काढले, पण मनमुराद पाण्यातखेळताच येईना; मोबाइल पाण्याने बिघडण्याची भिती!
सुर्यास्त होईस्तोवर लाटा अंगावर झेलल्या आणि नंतर परत आमच्या रिसोर्टला परतलो.
थोड्या थोड्या लाटा अंगावर घेऊन मन काही भरले नव्हते; पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी
उठून समुद्रकिनारी, so called ‘beach’ वर जायचे ठरले.
उन्हं निघाली होती. पुन्हा सकाळी समुद्र
किनाऱ्यावर पोहचलो. आज मात्र मोबाईल, पर्स काहीच न घेता आलो. पाण्यात मनसोक्त
डुंबलो, लाटा झेलल्या, त्या मऊ वाळूत आमच्याही पाऊलखुणा उमटवल्या. त्यानंतर केल्या बोट-राईडस.
पहिली
स्लीपिंग बोट-राईड :
काल या राईड चा छोटा चक्कर किनाऱ्याच्या
जवळूनच मिळाला होता संध्याकाळ झाल्यामुळे, आज मात्र किनाऱ्यापासून बरीच आत बोट
नेली होती, ट्यूब बोट होती ती. त्याचे पट्टे हाताने पक्के पकडायचे आणि बोटवर पालथे
व्हायचे. एकावेळी चार लोक ती राईड करू शकत होते. स्लीपिंग बोटचा दोर बाइक-मोटर-बोट
ला बांधला होता. बाइक-मोटर-बोट चालवणाऱ्या मुलाने त्याची बोट सुरू केली आणि
लाटांवरून तो आम्हाला किनाऱ्यापासून समुद्रात घेऊन गेला. उंच लाटेवर बोट गेली की
आम्हीही वर उचललो जायचो, लाटेवरून बोट
खाली आली की धपकन बोटवर आदळायचो, शिवाय आलेली लाट आम्हाला भिजवूनच पुढे जायची;
मज्जा आली फार!
दुसरी
बनाना-राईड :
ही पण ट्यूब बोट होती बनाना (केळाच्या )
आकाराची! त्यावर चढून बसायचे होते, एकामागे एक असे. या बोटचा दोरसुद्धा बाइक-मोटर-बोट
ला बांधला होता. स्लीपिंग-बोट राईड मधे मान वर केली की पाणी तोंडावर यायचे त्यामुळे
आजूबाजूचे सौंदर्य काहीच पाहता येत नव्हते. यात मात्र समुद्रकिनाऱ्यापासून आतले सौंदर्य
पाहता आले. मोठी लाट आली की बोट वर-खाली आदळायची. एक मोठा चक्कर झाला आणि परत किनाऱ्याकडे
निघालो. आम्ही किनाऱ्याजवळ पोहचणारच इतक्यात बोट चालवणाऱ्या मुलाने आम्हाला पट्ट्याला
पकडलेले हात सोडायचा इशारा दिला, आम्हीही हात सोडले, आणि त्याने बोट तिरपी केली. पुढल्या
क्षणी आम्ही समुद्रात! अर्थात पाय सहज टेकतील, इतक्या उंचीवरुनच त्याने बोट तिरपी केली.
तो इतका विलक्षण अनुभव-आनंद होता की वर्णन करता येत नाही! मागून येणाऱ्या लाटा आम्हाला
आपल्यासोबत पुढे वाहवत नेत होत्या. पहिली लाट ओसरून उभे राहतो तोच पुन्हा दुसरी लाट!
पुन्हा तोच आनंद, लाटांवर स्वार होऊन किनाऱ्याकडे वाहण्याचा! पायाखालची मऊ वाळू सरकण्याचा!
नंतर कळले की बनाना-बोट राईडची ती विशेषता होती!
समुद्राच्या लाटा अंगावर आदळत होत्या, सोबत
वाळूसुद्धा! ८-१० लाटा झाल्या की मग तोच समुद्र पाणी आत खेचायचा. आणि तेव्हा खरा अर्थ
कळला “पायाखालची वाळू सरकणे” या म्हणीचा. झरझर झरझर त्या पाण्यासोबत वाळूही आत ओढली
जायची. पुन्हा मोठी लाट येऊन आदळली की निघून गेलेली वाळू पुन्हा तशीच भरली जायची! थोडा
वेळ या खेळाचा आस्वाद घेऊन रिसोर्टला परतलो.
दूरवर पाण्यावर उन्हे चमचमायला लागली होती.
कपड्यांवर खारट पाणी, ओली वाळू तर मनात गोड अनुभव घेऊन, पुन्हा नारळी-पोफळी-केळीच्या
बागांतून वाट काढत, कोकमच्या देशातून पुढे चालत आम्ही निघालो, आपल्या कर्मभूमीला-
पुणे-दिवेआगार-पुणे!
Recent comments