|| श्री ||

मोगरा फुलला..


मोगरा! एक धुंद मंद सुवास! इवलेसे फुल मोगऱ्याचे, प गंध केवढा! वाऱ्याची हलकी झुळूक त्या फुलावरून आली की फुलात असणारी सुवासची कुपी ही झुळूक फुलाच्या नकळत उघडते, त्यातला थोडासा सुवास आपल्यासोबत घेऊन येते आणि त्या थोड्या सुवासाने कित्येकांना प्रफुल्लित करून जाते. वाऱ्याच्या अशा  कितीतरी झुळूक येतात, त्या कुपितला थोडा थोडा सुवास नेतात. पण तरीही त्या इवल्या फुलातील धुंद सुवास अक्षयच असतो. पांढऱ्याशुभ्र, नितळ, नाजूक पाकळ्या आणि फिकट हिरव्या रंगाचं देठ अस साधं, सात्विक रूप लेऊन ते पिटूकलं फुल हिरव्यागार झाडावर, वेलीवर अगदी अलगद फांदीला बिलगून बसलेलं असतं. जणू तान्हं बाळंच आईच्या कुशीत असावं.

असा हा मोगरा साधा, सात्विक पण  तरीही त्याची भुरळ भुंगा, फुलपाखरू, पक्षीच काय  तर माणसाला सुद्धा पडल्याशिवाय राहत नाही. मग ते छोटे बालक असो की वृद्ध आजोबा, नवयौवनात पदार्पण केलेली तरुणी असो की संसारात रमलेली ललना, बाईकवरून जीन्स घालून फिरणारे तरुण असो की ऑफिसमधे २० वर्षे घालविलेले काका अगदी संगळ्यांनाच त्याचा गंध हवाहवासा वाटतो. बहरून आलेला मोगरा पाहिला की भान हरपून जाते. रात्री तर त्याचे सौंदर्य काय वर्णन करावे? वाटतं आकाशातील चांदण्यांचा सडाच जणू मोगऱ्याच्या झाडावर पडलाय आणि इंद्रानं गुपचूप येऊन त्याच्याजवळच सुवासिक अत्तर त्यावर उडवलयं! आणि तेव्हा सहजच लता मंगेशकरांनी गाईलेल्या ओळी ओठांवर तरळायला लागतात,

                 “ मोगरा फुललाs  मोगरा फुलला.. “

        असा हा मोगरा फुलला की त्याच्यासोबत जुळलेल्या आठवणी देखील जाग्या होतात. आठवण होते आजीची! तिच्या परसातल्या मोगऱ्याच्या बागेची, तिच्या फुलांच्या परडीची, देव्हाऱ्यातल्या देवांच्या गळ्यातल्या फुलांच्या माळेची! रोज पहाटे तिने मोगऱ्याला पाणी घातले की मोगरा ताजातवाना होई आणि प्रसन्न होऊन तो आजीला आपल्या फुलांचे दान देऊ करी. त्यातली काही फुले आजी देवांकरिता राखून ठेवी आणि उरलेली बाकी फुलांची वाटणी आम्हा सगळ्यांमधे करून देई!

मोगऱ्याची फुले संगळ्यांचीच असत.  पान, झाडे मात्र आजीचीच! तीच त्यांच संगोपन करी आणि म्हणूनच ती झाडे आजीकरीत बहरत असत. आज आजी कायमचीच रुसली आहे आणि ती रुसली तेव्हापासून तिच्यासोबतच परसातला मोगराही रूसलाच आहे. तो बिचारा वाट पाहतो आहे त्या प्रेमळ मायेच्या  स्पर्शाची! पण तो स्पर्श त्याला पुनः कधीच होणार नाही. आजही आजीच्या परसात तो मोगरा आहे पण तोही उदासच उदास!

                       मिनल सालफळे जोशी

Leave a Comment

Invalid captcha. Please try again.

Blogs