|| श्री ||

आणि बालपण आठवलं..!

 

खरंच का गं आई, मी ही अशीच होते? ||

तु जेव्हा तव्यावर हाताने थालीपीठ थापायची

“कशी गं आई भाजेल ना हात “, मी म्हणायची

आज माझं कोकरु मलाही असंच म्हणालं

मला माझ बालपण नकळत आठवलं |

खरंच का गं आई, मी ही अशीच होते? ||

 

देवाचा नैवेद्य उपाशी राहून करायची

त्याकरिता मी तुला किती रागे भरायची

आज माझं कोकरु मलाही तसंच रागावलं 

त्यावरुन मला माझं देवावरच भाषण आठवलं

“देव म्हणतो का उपाशी रहा?”, तेच वाक्य त्यानं मला ऐकवलं

खरंच गं आई मला माझं बालपण आठवलं

खरंच का ग आई, मी ही अशीच होते? ||

 

घासातला घास तु तुझ्या पिल्लांकरीता ठेवायची

“तु का नाही खात पोटभर?”, मी तुला म्हणायची

आज माझं कोकरु मलाही असंच म्हणालं

माझ्याही तोंडून आई गं तुझंच वाक्य निघालं

“तु खाल्लंस की माझही पोट भरलं.”

गंमत अशी आई त्यानंही माझ्यासमोर विज्ञानाच ज्ञान मांडलं

“मी खाल्ल्याने तुझं कसं गं पोट भरलं?”

पुन्हा एकदा आई माझं बालपण समोर आलं

खरंच का गं आई, मी ही अशीच होते? ||

 

बाबा कधी चिडले तुझ्यावर की तुझ्या पाठीशी असायचो

दुसऱ्या दिवशी बाबांना तुझी बाजू समजावून सांगायचो

काल-परवा आई, माझंही कोकरु असंच वागलं

त्याच्या बाबालाही त्याचं कौतुक वाटलं

पुन्हा एकदा आई, मला माझं बालपण आठवलं

खरंच का गं आई मी ही अशीच होते?||

                                               मिनल सालफळे जोशी 

Leave a Comment

Invalid captcha. Please try again.

Blogs